राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज महाराष्ट्राने एक नवीन विक्रम केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. हे कायदे मंडळ असून, या ठिकाणी आपण वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आज (३ जुलै) पासून सुरुवात झाली. अधिवेशनात आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपचे राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस भाषणात म्हणाले, या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला एक विशेष महत्व आहे. हे कायदे मंडळ आहे या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो आणि विशेषत: आपल्या विधानमंडळाची रचना अशी आहे, की गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो, नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की, अगदी कर्नाटक, गोव्याच्या सीमेवरचा शेवटचा माणूस असो, प्रत्येकाचा विचार त्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या सगळ्या या सभागृहात या सदस्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनित होतात आणि छोट्यातील छोटा प्रश्न आणि मोठ्यातील मोठी अडचणदेखील सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे. म्हणून मला असे वाटते की, या सभागृहाचे अध्यक्ष होणे, हादेखील एक अत्यंत भाग्याचा असा योग आहे, जो तुम्हाला लाभला याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.

जावई आणि सासऱ्याचे एकमत होत नाही : फडणवीसांचे मिश्किल भाष्य
योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून, त्यांचे सासरे रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचे एकमत होत नाही, असे म्हणतात, असे मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले.

खरे म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्ती सारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. खरे तर हे कठीण काम आहे, ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला तो न्याय वाटतो. ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो; पण शेवटी अनेकदा आपण असे म्हणतो की, कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक खरी आणि एक खोटी; परंतु असे नाही एक त्यांची एक आमची बाजू असते; पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचे काम हे अध्यक्षांना करावे लागते.

मला अतिशय आनंद आहे, तुमच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. एक तरूण सहकारी म्हणून सभागृहातील तुमचे काम मी बघितले. दोन्ही सभागृह असतील, उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेले काम आणि विशेषत: कायद्यात निश्चितपणे काय आहे हे समजून घेऊन. न्यायालयाच्या कसोटीवरही आपला कायदा टिकला पाहिजे, यासाठी अतिशय चपखल असे मार्गदर्शन आपण सातत्याने करत होता. हे देखील मी बघू शकलो आणि म्हणून मला असे वाटते की, या कायदेमंडळाला एक अतिशय कायद्यात निष्णात असलेले असे अध्यक्ष मिळाले आहेत. अर्थात या पूर्वीच्या सगळ्या अध्यक्षांनी कदाचित ते कायदेपंडित नसतीलही; पण अतिशय उत्तम काम या आसनावरून केलं आहे. त्यामुळे याप्रसंगी त्यांचे स्मरण करणे आणि जे हयात आहेत त्यांचे अभिनंदन करणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Share