राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार, भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. मी नगरविकासमंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ मंत्री पायउतार झाले. एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा सैनिक होता; पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानसभेत आज रविवारी (३ जुलै) विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या अभिनंदन प्रस्तावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.

आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकते माप द्यावे, अशी इच्छा नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विधानभवन हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देश पातळीवरही त्यांना गौरवण्यात आले आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरून अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण (राहुल नार्वेकर) कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होतात; पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे. न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रमाणेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकते माप द्यावे, अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

अनेकांना वाटले होते, एकनाथ शिंदेला काय मिळणार? पण भाजपने माझा सन्मान केला
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांना फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. आमच्या संपर्कात १०, १५, २० जण आहेत, असे सांगितले जात होते. तेव्हा मी बोललो की, कोण तुमच्या संपर्कात आहे, ते सांगा मी त्यांना विमानाने पाठवून देतो. एकाला तर मी स्वत: विमान देऊन परत पाठवले. त्यामुळे आमदारांवर कोणतीही जोर-जबरदस्ती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११५ आमदार असूनही त्यांनी माझ्याकडे ५० लोक असताना मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्रिपद दिले. सगळ्यांना वाटले होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदेला काय मिळणार? परंतु भाजपने माझा सन्मान केला. सर्व पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय भाजपने घेतला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांचा आभारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Share