मुंबई, कोकणात पावसाचे धुमशान; रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातले आहे. मुंबईत दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे, तर लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. संबंधित पालक सचिवांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे. अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. माटुंग्यात रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून, ट्रॉम्बे परिसरातही पाणी साचले आहे. कुर्ला भागात रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. पूर्व उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशाचे हाल झाले. चेंबूर-सांताक्रुज जोडरस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चेंबूरमधील शेल कॉलनी, पोस्टल कॉलनी, चेंबूर कॅम्प, भक्ती भवन, पी. एल. लोखंडे मार्ग, घाटकोपरमधील पंत नगर, गारोडिया नगर, घाटकोपर (पश्चिम) रेल्वेस्थानक, भांडूपमधील कोकण नगर, मानखुर्दमधील रेल्वेस्थानक परिसर, चुनाभट्टी येथील रेल्वेस्थानक परिसर, स्वदेशी मिल परिसर आणि कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. मात्र, संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत होता.

मुंबईतील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून, खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाची अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

कोकणात पावसाचा धुमाकूळ; परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद
मुंबईसह कोकणातही पावसाने थैमान घातले आहे. चिपळूण परिसरातील परशुराम घाट शनिवारी रात्री दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढताच माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

परशुराम घाट गेले काही वर्ष धोकादायक ठरू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आता तर चौपदरीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई केली आहे. त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. शनिवारी (२ जुलै) रात्री घाटातील दरडीची माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. रस्त्यावरून माती बाजूला केल्यानंतर पहाटे पुन्हा वाहतूक सुरू केली होती. वाहतूक सुरू होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा एकदा परशुराम घाट धोक्याची घंटा वाजवू लागला आहे.

Share