राणे, राणा, कंबोज दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेला कारवाईसाठी केवळ राणा, राणे, राणावत, कंबोजच दिसतात का? महापालिकेला खान, पठाण, शेख यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई महापालिका आडनाव पाहून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असा आरोपही आ. शेलार यांनी केला. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने काल मुंबईत धाडी टाकून कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमच्या हस्तकांवर कारवाई केली. मात्र, राज्यातील पोलिस हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. हाच दोन्ही सरकारमधील फरक आहे. राष्ट्रवादी, हिंदुवादी आणि ढोंगी राज्य सरकारमधील हा फरक आहे. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र, दिल्लीतील शाहीनबाग, जहांगीरपुरीतील अतिक्रमणांवर ज्याप्रमाणे कारवाई होती, तशीच कारवाई मुंबईतील नागपाडा, बेहरामपाडा, मोहम्मद अली रोड येथे का होत नाही? दिल्लीत शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही अतिक्रमणांवर कारवाई करणारे बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचे काम आहे; पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, बेहरामपाडा येथे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे, अशी टीका आ. आशिष शेलार यांनी यावेळी केली.

गेल्या २५ वर्षांपासून मी राजकारणात आहे. एकदाही या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई झालेली नाही. या अतिक्रमणांकडे सरकार का दुर्लक्ष करते, असा सवालही आ. शेलार यांनी केला. तसेच शाहीनबागमध्ये कारवाई होते. तेव्हा मात्र हे सरकार कोल्हेकुई करते, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरे तोडण्यासाठी नोटीसा दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केले नाही का? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे, असे आ. शेलार म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरू करणार असल्यासंबंधी विचारले असता, आ. आशिष शेलार म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात लता मंगेशकर यांच्या नावाने चौक केला. मग हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान नाही का?अयोध्येतील नगरपालिकेला जागा ठरवून लता मंगेशकरांचा सन्मान करा हे सांगणारे भाजपचे सरकार आहे. मुंबईत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजलीसाठी हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने यासाठी मदत केली आणि महाराष्ट्र सरकार मात्र झोपले होते. शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही, अशी टीकाही आ. शेलार यांनी केली.

Share