३ मेपर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई

नाशिक : राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेले असतानाच नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरवण्याचे आदेश दिले आहेत. मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी ३ मेपर्यंत पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कोणत्याही धार्मिक स्थळी अथवा अन्य ठिकाणी परवानगीशिवाय भोंगे लावता येणार नाही, असे पांडेय यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत असा निर्णय घेणारे नाशिक हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे.

भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेत येत्या ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ३ मेपर्यंत भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा राज यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावर जो अल्टिमेटम दिला आहे त्याचा संदर्भ देत नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३ मेपर्यंत भोंग्याची परवानगी घेण्यासाठी धार्मिक स्थळांना अर्ज करता येणार आहे. ३ मेनंतर परवानगी न घेता धार्मिक स्थळावर विनापरवानगी भोंगे लावल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी डेसिबलची मर्यादा व इतर नियमही ठरवून दिले आहेत. ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ४० अंतर्गत हा आदेश दिला आहे. सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही पांडेय यांनी केले आहे.

मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा लावण्यास बंदी
मशिदीच्या १०० मीटर परिसरात तसेच अजानच्या १५ मिनिटे अगोदर भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करण्यावरदेखील पोलिसांनी बंदी घातली आहे. सामाजिक सहिष्णुता कायम राहावी, यासाठी हा आदेश दिल्याचेही पांडेय यांनी म्हटले आहे. भोंग्याबाबत जारी केलेल्या नियमावलीचा भंग केल्यास संबंधिताविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

…अन्यथा ४ महिने ते १ वर्षापर्यंतचा तुरुंगवास
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळ, आस्थापनांना पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. लेखी अर्जानंतर भोंगे लावण्याची परवानगी मिळणार आहे. विनापरवानगी भोंगे असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये किमान चार महिने ते एक वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास थेट चार महिने कारावास आणि शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले जाईल,  असेही पोलिस आयुक्त पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

Share