राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करतेय : अजित पवार

बारामती : उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे.राज्यात आणि केंद्रात कोळसा टंचाई आहे. कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती घटली आहे. त्‍यामुळे राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. राज्यात ३ ते ४ हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेजारील राज्यातून वीज विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे (खुर्द) येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, आपल्याकडे वीज निर्मितीसाठी फक्त विदेशी कोळसा चालत नाही. काही प्रमाणात आपल्या इथला कोळसा लागतो. सध्या विजेची मागणी वाढली आहे. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे. बाहेरील कोळसा राज्यातील पॉवर पॉईंटला जास्तीच्या प्रमाणात चालत नाही. मात्र, परदेशी आणि देशी कोळसा वापरून विजेचे संकट दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वीज जपून वापरा, असे आवाहनही त्यांनी केले. धरणातील पाणी पाऊस पडेपर्यंत शेतीसाठी राखून ठेवण्यात येणार असून, उर्वरित पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच आपण जी वीज वापरतो त्याचे बिल भरलेच पाहिजे. शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. त्यातून राज्याला सावरण्याचे काम ठाकरे सरकारने केले, असे ते म्हणाले.

जाती-धर्मात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. येत्या ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे काढावेत, असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. देशातील कायद्यापेक्षा आणि सुप्रीम कोटापेक्षा स्वतःचा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठे वाटत असतील तर, जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. यावर अजित पवार यांनी सर्वांना शांतता राखण्याचे केले. विविध धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणांमध्ये, उत्साहात, जयंतीत सहभागी झाले पाहिजे. सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे. जाती-धर्मात तेढ निर्माण होणार नाही, सगळे गुण्या गोविंदाने नांदतील असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांना सांगितले आहे. म्हणूनच आपला भारत देश एकसंघ पहायला मिळतो, असे पवार म्हणाले.

 

Share