आयआयटी मुंबईकडून औरंगाबादमधील रस्त्यांचे सर्वेक्षण

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात ३१७ कोटींची १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी रस्त्यांचे डिझाईन आयआयटी मुंबईला पाठविण्यात आले. त्यानुसार आयआयटीचे पथक शहरात येऊन रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच मे च्या शेवटच्या आठवड्यात रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने मार्च महिन्यात शेवटच्या दिवशी शहरातील १०८ रस्त्यांच्या कामाची निविदा अंतिम केली आहे. हे काम ए. जी. कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा नारळ केव्हा फुटणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याविषयी स्मार्ट सिटीचे प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी सांगितले की, रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. रस्त्याचे पीएमसी व कंत्राटदाराने तयार केलेले डिझाईन तपासणीसाठी आयआयटी मुंबईला पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आयआयटी मुंबईचे पथक लवकरच शहरात येऊन रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. आयआयटी मुंबईचा अहवाल प्राप्त होताच रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाईल.कामे घेणार गतीस्मार्ट सिटी अभियानात मंजूर कामांना येत्या काही दिवसात गती मिळणार आहे. तीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम लवकरच सुरू होईल. दोन दिवसात सिडको एन-११ आणि आंबेडकरनगर येथील हॉस्पिटलचे काम सुरू होईल. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्याच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

Share