शिवाजीराव आढळराव पाटलांची आधी हकालपट्टी, मग उद्धव ठाकरेंचा फोन

मुंबई : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबतचे वृत्त चुकीचे असून, ते शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला फोन केल्याचे करून घडलेल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

आज (३ जुलै) सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये शिरूर (जि. पुणे) चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आढळराव पाटील यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते. मात्र, आता हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून शुद्धिपत्रक काढून आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत राहतील, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्विटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते. हेच ट्विट आढळराव पाटील यांच्यावरील कारवाईस कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये या आदेशात तथ्य नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. आज दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकामध्ये मध्ये छापून आलेली बातमी अनावधानाने छापून आलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळे हा आदेश नेमका कोणाकडून काढण्यात आला होता. तसेच हा सगळा प्रकार नक्की कोणत्या गैरसमजातून किंवा अन्य कारणाने घडला, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत भविष्यात वेगळा विचार करण्याचे संकेत दिले. या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली, त्याचे काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवे तर उद्धव ठाकरेंना भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नेमके काय म्हटले?
आज सकाळपासून मला अनेकांचे फोन आले. ‘सामना’मध्ये तुमच्या हकालपट्टीची बातमी वाचल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला मला ती मस्करी वाटली. आधी मला विश्वासच वाटेना. त्यानंतर मी ‘सामना’ वाचला आणि मला धक्का बसला. काल रात्रीच माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलणे झाले होते. मतदारसंघातले ५० कार्यकर्ते तुम्हाला उद्या भेटायला येतील. आज माझ्या जनता दरबार असल्याने मी आज येऊ शकत नाही. मी मंगळवारी तुम्हाला भेटायला येईन, असे मी त्यांना फोनवर सांगितले होते, असे पाटलांनी पत्रकारांना सांगितले.

मी पक्षाविरोधात कोणती कारवाई केली ते कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरेंनी काल फोनवर बोलताना मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या माझ्या पोस्टचा उल्लेख केला. त्या पोस्टबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात काहीच गैर नसल्याचे मी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यावर जे झाले ते झाले, असे ठाकरे म्हणाले. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार. राष्ट्रवादी, भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेकदा झाल्या. मात्र, तुम्ही पक्ष सोडून गेला नाहीत याचे कौतुक वाटते. तुम्ही जाणार अशी चर्चा असतानाही तुम्ही कधी गेला नाहीत आणि जे कधीही जाणार नाहीत अशी खात्री वाटत होती ते मात्र सोडून गेले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मी राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा बहुधा मला मिळाली असावी. मी अस्वस्थ आहे. काय बोलावे ते कळत नाही. एक-दोन दिवस विचार करेन आणि पुढचे काय ते ठरवेन, असे आढळराव पाटील यावेळी म्हणाले.

Share