पुण्यातील लाल महालात तमाशातील गाण्यांवर रिल्सचे शूटिंग

पुणे : सध्या रिल्स तयार करण्याचा प्रकार चांगलाच वाढला आहे. कोणीही रिल्स तयार करून शेअर करीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र, रिल्स तयार करण्यासाठी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये चक्क लावणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शूटिंगचे करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर शिवप्रेमी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

सध्या लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी पुण्यातील लाल महालमध्ये लावणी करण्यात आली. कुलदीप बापट यांनी या रिल्सचे चित्रीकरण केले आहे. तसेच वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केले आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

हा लाल महाल जिजाऊ-शिवरायांची अस्मिता आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवले, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र, पोलिस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र, आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, लाल महालात सुरक्षा व्यवस्था असतानाही परवानगी न घेता कलावंतांनी शूटिंगसाठी प्रवेश घेतलाच कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे. लाल महालाभोवती महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले का नाही, हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. लाल महालात लावणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत सुरक्षा रक्षकाला विचारणा करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षकाने वरिष्ठ नेत्याची परवानगी होती, म्हणून कलावंतांना आत सोडले, असे सांगितले.

Share