अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे अमित शहा यांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंग

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १ जून रोजी दिल्लीत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले जाणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य काही केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन दिवस आधी पाहणार आहेत. “आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा, भारतमातेच्या शूर पुत्रांपैकी एक, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवनावरील महाकाव्याचे साक्षीदार होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांची जीवनगाथा ते पाहणार आहेत”, असे चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी म्हटले आहे.
‘पृथ्वीराज’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहानच्या प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/tv/Cd7hRO5lRSV/?utm_source=ig_web_copy_link

हा चित्रपट अॅक्शन सीन्सने खचाखच भरलेला आहे. यातील अनेक दृश्य बघून अंगावर काटा उभा राहतो. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे, तर आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Share