ठाकरे सरकार जूनच्या आधी गडगडणार…

वाशिम : आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळं येतात. त्या वादळात मोठ-मोठ्या फांद्यांची झाडे मुळासह उन्मळून पडतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही फांदीसारखे आहे. ठाकरे सरकार या झाडाचे बुड नाही, ती फांदीच आहे, तेव्हा हे सरकार येत्या जून महिन्याच्या राजकीय वादळात उन्मळून पडेल, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ते आज (१९ एप्रिल) वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकार कोसळण्याच्या तारखा याआधी भरपूर वेळा जाहीर केल्या आहेत. आता सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातील सरकार पडण्याची नवी तारीख नारायण राणेंनी जाहीर केली आहे. जून महिन्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून जातील, असा दावा राणेंनी केला आहे.
राणे म्हणाले की, आमच्या कोकणात जून महिन्यामध्ये वादळ येते. वादळ आले की, झाडे उन्मळून पडतात. राज्यात तीन पक्षांचे म्हणजे महाविकास आघाडीचे एक फांद्यांचे झाड आहे, एका फांदीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते मुख्य खोडावर नाहीत. त्यामुळे हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच पडेल. महसूलमंत्री असताना ८२ एकरचा सरकारी भूखंड फक्त १२ कोटी रुपयांमध्ये विकल्याच्या आरोपावर राणे म्हणाले, माझे राज्य सरकारला आव्हान आहे की, फक्त आरोप करू नका, कोणतीही चौकशी लावा, मी तयार आहे.

खा. संजय राऊतांचे राणेंना उत्तर
गेली ५० वर्षे शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतवून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची शिवसेनेची क्षमता महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार दर संजय राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले.

Share