राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून ‘ती’ नावे वगळणार?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर राज्यपालांकडून नियुक्त करावयाच्या १२ आमदारांच्या नावांची यादी दीड वर्षांपूर्वी राज्यपालांना सादर केली आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या संदर्भात अद्यापही निर्णय घेतला नाही. दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांची नावे वगळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेसचे सचिन सावंत, शिवसेनेचे विजय करंजकर यांची नावे वगळण्यात येणार असल्याचे समजते, तर महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यापूर्वीच आपण आमदारकी स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता चार वेगळी नावे टाकून नवीन यादी राज्यपालांना पाठविण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीत शरद पवारांनी पतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या यादीतून राजकीय व्यक्तींची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नवीन यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात राज्यपालांकडे पाठवण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विधान परिषदेवर राज्यपालांकडून नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली होती आणि नंतर ती राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती, पण गेल्या दीड वर्षांपासून ही यादी राज्यपालांच्या कार्यालयातच पडली असून, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नव्या यादीत प्रोटोकॉल पाळून वेगवेगळ्या क्षेत्रातून ही नावे पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे या नावांना राज्यपालांची कोणतीही हरकत नसेल, अशी रणनीती महाविकास आघाडीकडून आखण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव बाजूला पडणार आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आगामी निवडणुकीत संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे, तर राजू शेट्टी यांनी आधीच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, आपले नाव या यादीतून वगळन्याची विनंती त्यांनी राज्यपालांना भेटून केली आहे. नव्या नावांवर राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ते’ पत्र बनावट
दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचे पत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. राज्यपालांनी ६ आमदारांची नावे सुचवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनकडून करण्यात आला आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या ६ नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर २०२० चे आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या कथित पत्रात काही नावे सूचविण्यात आली आहेत. यामध्ये वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांचा समावेश आहे. मात्र, ‘ते’ पत्र बनावट आहे. राज्यपालांकडून १२ पैकी ६ आमदारांची नावे दिल्याचे या पत्रात म्हटले होते; परंतु तसे काहीही नाही, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share