देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुर

मुंबई : देशात पाहिली रेल्वे सेवा मुंबई – ठाणेदरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेरून दिसून आले आहे.  जलवाहतुकीच्या या सेवेचेदेखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली  पाहिजे या भावनेने त्याकाळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी सुरु केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्त्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो  याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकासात दळणवळणाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. समुद्र हा केवळ पाहण्यासाठी नसून त्याचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार असून हा क्रांतिकारक टप्पा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई- कोकणाला जोडणारा  सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले  आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईत पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य

नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे  अनेक पायाभूत सुविधांचा राज्य  शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करतांना  उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकोपयोगी कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया,  त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Share