आईनेच केला पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा खून

सातारा : जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पांढरी तरडगाव (ता. फलटण) येथे समोर आली आहे. लोणंद पोलिसांनी खुनी आईला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या महिलेने आपल्या बाळाचा खून का केला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पांढरी तरडगाव (ता. फलटण) येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलिस स्टेशनला फोन करून तिच्या पाच महिन्याच्या बाळाला १२ एप्रिल रोजी दुपारी ठार मारून पुरले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा. नाही तर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते. फोनवरून ही माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, पोलिस नाईक वाघमोडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल अहिवळे यांनी पांढरी तरडगाव येथे जाऊन खात्री केली. यावेळी महिलेने आपला मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला ब्लँकेटमध्ये गुंडाळले. उशीने नाक, तोंड दाबून त्‍याचा खून केला. यानंतर मृतदेह पुरल्‍याचे पोलिसांना सांगितले.

आज रविवारी (२४ एप्रिल) वाई उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे, लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खोदण्यात आले  असता मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. संशयित महिलेवर लोणंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्‍यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस  कोठडी सुनावली आहे.

Share