ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदार दिया कुमारी यांचा दावा

जयपूर : वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वादानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच जयपूरच्या राजघराण्याने ताजमहालवरून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. राजसमंदच्या भाजपच्या खासदार आणि शाही परिवारातील दिया कुमारी यांनी आग्रा येथील ताजमहालबाबत मोठे विधान केले आहे. ताजमहाल हा मुघलांचा नसून आमच्या पूर्वजांचा वारसा आहे. ताजमहाल ही आमची संपत्ती आहे, असे खा. दिया कुमारी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ताजमहालवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा मंदिर पाडून ताजमहाल बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. खासदार दिया कुमारी म्हणाल्या की, ताजमहाल ही आमची संपत्ती आहे. ताजमहालाची जमीन आमच्या पूर्वजांची होती. जमीन आमची होती; परंतु सत्ता मुघलाची होती. त्यांनी जमीन घेतली आणि ताजमहाल बांधला. कदाचित त्यांना ती जमीन आवडली असेल. ताजमहाल ज्या जमिनीवर बांधण्यात आलाय ती जमीन जयपूरच्या शाही कुटुंबाच्या मालकीची असून, या जमिनीचा मालकी हक्क सांगणारे कागदपत्रंही आपल्याकडे असल्याचा दावा दिया कुमारी यांनी केला.

आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल जयपूर राजघराण्याच्या भूमीवर बांधला गेला आहे. ताजमहालची जमीन आमच्या पूर्वजांची आहे. मुघल सम्राट शाहजहानने जयपूर राजघराण्याची जमीन बळकावल्याचा आरोप खा. दिया कुमारी यांनी यावेळी केला. न्यायालयाने आदेश दिल्यास कागदपत्रेही देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. हा दस्तऐवज राजघराण्यातील पोथीखान्यात असून ताजमहालच्या बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, यातून अनेक सत्य बाहेर येतील, असाही त्यांनी दावा केला.

योग्य तपास केल्यावरच सर्व तथ्य समोर येईल : खा. दिया कुमारी
संपूर्ण ताजमहाल पाडावा, असे मी म्हणणार नाही; परंतु ताजमहालच्या ज्या खोल्या बंद आहेत, त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्या खुल्या केल्या पाहिजेत, जेणेकरून तेथे काय आहे, आणि काय नाही हे कळेल. त्याची रीतसर चौकशी झाल्यावरच सर्व वस्तुस्थिती स्पष्ट होईल. आमच्याकडे त्या जमिनीबाबत (ताजमहालची जमीन) कागदपत्रेही आहेत. त्या कागदपत्रांनुसार तेथे पूर्वी राजवाडा होता, शाहजहानने तो ताब्यात घेतला, कारण त्यावेळी तो सत्तेत होता. आज सरकारने जमीन संपादित केली तर त्याचा मोबदला दिला जातो; पण मुघल सत्तेत असा कोणताही कायदा नव्हता की आम्ही नुकसान भरपाईसाठी अपील करू. ताजमहालची जमीन जयपूर राजघराण्याकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज कोणीतरी याचिका दाखल केली ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र हवे असल्यास ते आम्ही न्यायालयाला सादर करू. जेव्हा शाहजहानने जमीन ताब्यात घेतली तेव्हा जयपूर राजघराण्याचे राजे जयसिंह होते. ही मालमत्ता आमचा वारसा होती. याबाबत आमच्या पुस्तकांमध्येही नोंद आहे. आमच्या पोथीखान्यात जमिनीशी संबंधित कागदपत्रे ठेवली आहेत, असेही खा.दिया कुमारी यांनी सांगितले.

सत्याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करा; लखनौ खंडपीठात याचिका दाखल

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात एक रिट याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात ताजमहालच्या इतिहासाचे सत्य समोर आणण्यासाठी तथ्य शोध समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत इतिहासाचे स्पष्टीकरण देण्यासाठी ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ही याचिका अयोध्येतील रहिवासी डॉ. रजनीश सिंह यांनी त्यांचे वकील राम प्रकाश शुक्ला आणि रुद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत दाखल केली आहे.

ही याचिका न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये दाखल करण्यात आली असून, ती रजिस्ट्रीने मंजूर केल्यानंतर ती संबंधित खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवली जाईल. १९५१ आणि १९५८ मध्ये केलेले कायदे घटनेतील तरतुदींच्या विरोधात घोषित करावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत ताजमहाल, फतेहपूर सिक्री किल्ला आणि आग्रा येथील लाल किल्ला या इमारतींना ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये केंद्र सरकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ताजमहालच्या बंद दरवाज्यांमध्ये भगवान शिवाचे मंदिर असल्याचे मानले जाते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत अयोध्येतील जगद्गुरू परमहंस यांची भेट आणि भगव्या कपड्यांमुळे त्यांना ताब्यात घेण्याबाबत नुकत्याच झालेल्या वादाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Share