लीलावती रुग्णालयातील फोटोसेशन नवनीत राणांना भोवणार; बॉडी गार्डवर गुन्हा दाखल

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आणि जोरदार आक्षेपानंतर वांद्रे पोलिसांनी नवनीत राणा यांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल केला आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हनुमान चालिसा पठण वाद प्रकरणी तसेच राजद्रोहाच्या आरोपाखाली १२ दिवस तुरुंगात होतया. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर मानेच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना एमआरआय रुममध्ये नेले असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

नवनीत राणा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच फोटोंवर शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात जाऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. एखादा रुग्ण एमआयआर कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरू असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आत कसा नेण्यात आला? यामुळे उद्या रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. तसेच याप्रकरणी लीलावली प्रशासन काय कारवाई करणार? असा सवालही शिवसेना नेत्यांनी विचारला.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी निवेदन दिले होते. अखेर खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रूग्णालयातील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परवानगी नसताना एमआरए विभागात जाऊन एमआयआर मशीनजवळ मोबाइलवर फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले होते. राणा यांच्यासोबत त्यांचा अंगरक्षक आणि एक व्यक्ती विभागात गेली. त्या व्यक्तीनेच फोटो काढल्याचे रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

Share