डीलर कमिशन वाढीसाठी पेट्रोल पंप चालकांचे मंगळवारी आंदोलन ; इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी येत्या मंगळवारी (३१ मे) आंदोलन पुकारले आहे. डीलरचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी पेट्रोल-डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनने घेतला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या या आंदोलनामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

या आंदोलनामुळे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांना त्यापूर्वीच इंधन टाकी फूल करावी लागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क आणि इतर करांचा वाद सुरू असतानाच आता यामध्ये पेट्रोल पंप चालकांनी उडी घेतली आहे. २०१७ पासून कंपन्यांनी डिलर कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. मागील काही वर्षांपासून पंप चालकांनी डीलरच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कंपन्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनने ३१ मे २०२२ रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन देशभरात होणार आहे. त्यामुळे ३१ मे रोजी पेट्रोल डिलर कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाहीत. परिणामी महामार्गांवर, निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या पंपावर इंधन टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले की, नुकतेच पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर केंद्र सरकारकडून कमी करण्यात आल्याने पेट्रोलच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळं पंप मालकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आम्ही जास्त किंमत देऊन इंधनाची खरेदी केली होती; पण दरात कपात झाल्यामुळे आम्हाला हा स्टॉक आता खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकावा लागत आहे. केवळ डीलर कमिशन वाढवणे ही एकच मागणी नाही, तर केंद्र सरकारने अचानक शुल्क कपात केल्याने पेट्रोल पंप चालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्याची भरपाई मिळावी हीदेखील मागणी आहे. या आंदोलनातून इंधन वितरक कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे रवी शिंदे म्हणाले.

सरकारद्वारे पंप मालकांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय किंमतीत अचानक कपात करण्याचा प्रकार दुसऱ्यांदा झाला आहे. जेव्हा इंधनाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये इंधनाचे दर कमी झाले होते. आम्ही तेव्हापासून सरकारकडे डीलरचे कमिशन वाढवण्याची मागणी करत होतो. डीलर्सचे कमिशन शेवटचे सन २०१७ मध्ये वाढवण्यात आले होत. गेल्या पाच वर्षांत आमच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे; पण कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या विरोधात आणि डीलरचे कमिशन वाढवून मिळावे, यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा, बिहार आणि इतर राज्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे. मात्र, या आंदोलनाचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही. या काळात पेट्रोल पंप खुले राहतील, असे पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Share