बुलडाणा : येणार्या वर्षातील पीक-पाण्याची परिस्थिती, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवणारी आणि विदर्भात प्रसिद्ध असलेली भेंडवळ (ता.जळगाव) यावर्षी पावसाळा सर्वसाधारण स्वरूपाचा असून, खरिपातील तूर, कपाशी व रब्बीतील गहू, हरभरा ही पिके सर्वोत्तम राहतील, राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही; परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असे भाकित वर्तवण्यात आले.
सुमारे तीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ घटमांडणी व पीक पाणी व पाऊस अंदाज वर्तविण्याची प्रथा आजही त्यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवली आहे. अक्षय तृतीयेला गावाबाहेरील शेतामधील घटांमध्ये सायंकाळी मांडलेल्या या घटमांडणीचे भाकित बुधवारी (४ मे) पहाटे पाच वाजता जाहीर करण्यात आले. बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांसह खानदेशातील हजारो शेतकऱ्यांसमक्ष चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी चंद्रभान महाराजांच्या जयघोषात हे भाकित जाहीर केले.
पावसाचा अंदाज
घटामध्ये घागर खाली असलेल्या मातीची ढेकळे पूर्णपणे ओली झाली होती. त्यावरून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. जून महिन्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण स्वरूपाचा असून, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी राहील. आगस्ट महिन्यात पाऊस हा एकदम चांगला असेल, तर सप्टेंबरमध्ये हा तिसऱ्या महिन्याहून अधिक पाऊस असेल. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पावसामुळे कुठे कुठे पूर परिस्थितीसुद्धा संभवते. यावर्षी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊससुद्धा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. घटामध्ये पुरी गायब असल्यामुळे पुराचे संकटसुद्धा बऱ्याच ठिकाणी उदभवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तिसर्या आणि चौथ्या महिन्यामध्ये कुठे अधिक तर कुठे भरपूर स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे जिथे जास्त स्वरूपाचा पाऊस पडेल तिथे पिकांची नासाडीसुद्धा होऊ शकते आणि जिथे कमी स्वरूपाचा पाऊस पडेल तिथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही यावेळी सारंगधर महाराजांनी सांगितले. वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशभरात पीक चांगले येईल. मात्र, पिकांना अपेक्षित भाव मिळणार नाही. पशुपालकांना चाराटंचाईचा बर्याच भागात सामना करावा लागणार आहे.
राजकीय भाकित
राजा हा कायम असणार म्हणजे देशात सत्तांतर होणार नाही. परकीय संकट येईल व राज्याची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची राहणार आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही कमकुवत होणार, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटामध्ये विड्याच्या पानावर पैशावर सुपारी ठेवली होती. ती थोडी सरकली आहे. राजा कायम असला तरी आर्थिक टंचाई भासणार आहे, असा याचा निकष आहे.
आरोग्यविषयक भाकित
भादली हे पीक रोगराईचे प्रतीक आहे. भादली हे घटाच्या आत-बाहेर फेकले गेले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात रोगराई येणार आहे;पण मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी राहणार आहे. देशात व राज्यात गतवर्षीसारखी रोगराई नसेल.
घटमांडणीची ३५० वर्षांची परंपरा
सुमारे ३५० वर्षांच्या परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी ३ मे रोजी सायंकाळी गावाच्या जवळच असलेल्या शेतामध्ये घटमांडणी करण्यात आली. या घटाच्या मध्यभागी एक खड्डा करून मातीच्या ढेकळांवर पाण्याची घागर ठेवण्यात आली आणि त्या घागरीवर कुरडईचा नैवेद्य ठेवण्यात आला. खड्ड्याभोवती गोलाकार घटामध्ये १८ प्रकारची धान्ये ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मे रोजी पहाटे ५ वाजता पुंजाजी महाराज त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी घटाचे अवलोकन केले. घटातील मातीच्या ढेकळाची घागर, कुरडई, नैवेद्य व त्याचे निरीक्षण करून देशभरातील पीक-पाण्याचा अंदाज, देशाची संरक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी, भाकित वर्तवण्यात आले. गुढीपाडव्याला गावातील पारावर मांडलेल्या पूर्व मांडणीच्या निष्कर्षाशी ह्या अक्षयतृतीयेच्या मांडणीचे निकष जोडण्यात आल्यानंतर पाऊस, पीकपाण्याची भविष्यवाणी वर्तवण्यात आली.