राज्यसभेच्या १६ जागांसाठी महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये मतदान सुरू

नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमधील राज्यसभेच्या १६ रिक्त जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली असून, संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारण रंगात आले आहे.

१५ राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राज्यसभेच्या एकूण ५७ जागांपैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १६ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी, राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी ४ तर हरियाणामध्ये २ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांची मते फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले होते.

भाजपतर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मुकुल वासनिक, अजय माकन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे नेते संजय राऊत आदी दिग्गज नेते या निवडणुकीसाठी उमेदवार असून, या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने चार राज्यांत अतिरिक्त आणि अपक्ष उमेदवार उभे केल्याने ही लढत रंजक बनली आहे.

महाराष्ट्रातील ६ जागांसाठी चुरस 
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपचे ३, राष्ट्रवादीचा १, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ असे एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपतर्फे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेतर्फे संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत सहाव्या जागेवर कोणता उमेदवार विजयी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता; परंतु ठाकूरही आघाडीला साथ देण्याबाबत साशंकता आहे. दरम्यान, सपा आणि एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. सहाव्या जागेसाठी या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस असणार आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून विधानभवनात मतदानाला सुरुवात झाली. भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.

राजस्थानात भाजपने अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस अडचणीत 

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. आकड्यांचा विचार करता यातील तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला तर एक जागा भाजपकडे जाईल. मात्र, भाजपने येथे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने येथून मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १०८ आमदार आहेत, तर १३ अपक्ष, सीपीएमचे दोन आणि बीटीपीचे दोन आमदार सोबत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, तिन्ही उमेदवार राज्याबाहेरचे असल्याने काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजी भोवण्याची भीती आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या असंतोषाचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ४१ मतांची गरज आहे.

कर्नाटकमध्ये चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत 
कर्नाटकात चार जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसने येथे जयराम रमेश, मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली आहे. दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी काँग्रेसला २० अतिरिक्त मतांची गरज आहे. काँग्रेसला यापूर्वी जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसकडून पाठिंबा अपेक्षित होता. मात्र, जेडीएसने कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशिवाय लहरसिंग यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला जेडीएसचा पाठिंबा मिळाला नाही तर दुसरी जागा जिंकण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे १२१ आमदार असून, तीन जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेसने ७० आमदार असताना २ उमेदवार दिले आहेत, तर जनता दल (से.) ने ३२ आमदार असताना १ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. कर्नाटकमध्ये राज्यसभा उमेदवार निवडून येण्यासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

हरियाणात दोन जागांसाठी निवडणूक
हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा सहज मिळेल. मात्र, भाजपने या ठिकाणी अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांना उभे केल्याने ही लढत चुरशीची बनली आहे. या राज्यात एक जागा जिंकण्यासाठी ३१ आमदारांच्या मतांची गरज आहे. काँग्रेसचे तेवढेच आमदार आहेत. पक्षाने अजय माकन यांना येथे उमेदवारी दिली आहे. माकन हे बाहेरचे असल्याने पक्षात असंतोष आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मते फुटली तर माकन यांचा विजयाचा मार्ग अवघड होईल.

Share