जनतेचा कौल आम्हाला मान्य : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली, आम्हाला राज्यात काम करण्यासाठी फक्त पाच वर्षे मिळाली; पण यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या विकासासाठी गोष्टी मांडल्या. अखेर कोणाला कौल द्यायचा हे मतदारांनी ठरवायचे असते, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा १८ हजार ९०१ मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे. या निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका मांडली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचे पालन करताना हिंदूंनी इतरांचा आदर केला पाहिजे. आम्ही उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही विकासाचे मुद्दे घेऊन लढलो. १५ वर्षांत त्यांनी काय काम केले आणि आम्ही पाच वर्षात काय काम केले, हे जनतेसमोर ठेवले. भाजपने ७ वर्षात केंद्रात काय काम केले. हेही आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो. आगामी काळात आम्ही काय काम करणार आहे, हे जनतेला आम्ही सांगितले.

भाजपने सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला

भाजपने सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला आहे. देशात, राज्यात, कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. पालकमंत्र्यांनी काय केले हे सांगावे, असे पाटील म्हणाले. चमत्कार हा चमत्कार असतो. भाजप विजयी झाला असता तरीदेखील सत्ताधाऱ्यांनी टीका केली असती आणि पराभव झाला असता तरीही टीका करतील. मला टीकांची सवय झाली आहे, असे चंद्रकांतदादांनी सांगितले. कोल्हापूरच्या या पोटनिवडणुकीत तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत राहिली. ही अटीतटीची निवडणूक झाली आहे. आम्ही एकट्याने ७७ हजार मते क्रॉस केली, तोंडाला फेस आणला. निवडणूक असते हार-जीत ही होत असते. नागरिकांनी दिलेला मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो. सत्यजीत कदम लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर काय झाले असते.  दरम्यान, या पराभवानंतर तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता, मला कुठे जायचं आहे हा माझा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे, असे उत्तर पाटील यांनी दिले.


पाटील म्हणाले की, आम्ही प्रयत्न करण्यात कुठे कमी पडलो नाही. या पोटनिवडणुकीत पैशाचा, दंडुकेशाही आणि जातीचा वापर केला गेला. माझ्या अंगावर येण्यास देखील ते मागे राहिले नाहीत. आम्ही या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करू. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो, बंटी (सतेज) पाटील म्हणतात की, ही निवडणूक धर्मावर नेली. हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही, तर श्वास आहे, राजकीय आवश्यकता म्हणून हिंदुत्व वापरत नाही. हिंदू धर्मामध्येच सर्वधर्मसमभाव आहे. दुसऱ्या धर्माबद्दल आदर हा हिंदूंनी केला. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्या झाडालाच दगड मारले जातात. कोण म्हणते, कोथरूडला परत या, कोण म्हणते, हिमालयातून परत या, माझ्यावर किती लोक प्रेम करतात पाहा, असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.

शिवसैनिकांना इच्छा असूनदेखील भाजपला मदत करता आली नाही

शिवसैनिकांच्या मनात असूनदेखील त्यांना भाजपला मदत करता आली नाही. कारण मुंबईहून अनेक निरीक्षक आले होते. सत्यजीत कदम यांना मिळालेल्या मतांमुळे बावडेकरांनी नक्की धसका घेतला असेल. जयश्रीताई यांच्या निमित्ताने एक महिला आमदार झाल्या, त्यांना शुभेच्छा देतो. मी मन मोठे केले होते. दोन वेळा जयश्री जाधव यांच्याकडे उमेदवारी घेऊन गेलो होतो, असेही चंद्रकांत दादा म्हणाले.

Share