राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

पुणे : राज्यसभेचे माजी सदस्य संभाजीराजे भोसले यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढविणार असून, ‘स्वराज्य’ या नावाने संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ ३ मे रोजी संपला आहे. संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच आपली पुढील भूमिका १२ तारखेला जाहीर करणार असल्याचे त्यांनी कोल्हापुरातील एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते काय निर्णय जाहीर करणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (१२ मे) पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी
ते म्हणाले, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मात्र, जनसेवा करायची असल्यास राजसत्ता हवी. यासाठी मी दोन निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय मी राज्यसभेचा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवेन. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या जुलै महिन्यात निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या संख्याबळानुसार ३ जागा भाजप, १ जागा राष्ट्रवादी, १ जागा शिवसेना आणि १ जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला २ आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी १ जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर मी दावा सांगत आहे. या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केले.

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठे मन दाखवायला हवे. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावे, अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो, असे संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

स्वराज्य संघटनेची स्थापना 
मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. छत्रपती घराणे म्हणून नाही तर मी पक्ष विरहित काम करत आहे. मला चांगले-वाईट अनुभवदेखील आले. या जनतेला एका छताखाली कसे आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचे नाव आहे ‘स्वराज्य’. ‘स्वराज्य’ संघटनेचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मी लवकरच राज्याचा दौरा करणार आहे. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करण्यासाठी हा दौरा असेल. माझी संघटना कोणत्याही राजकीय पक्षावर दबावतंत्र नाही, असे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

छत्रपती शिवराय व शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार
२००७ पासून मी गोंदिया जिल्हा सोडला तर संपूर्ण राज्य अनेक विषयांसाठी पिंजून काढले. छत्रपती शिवराय व शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्याचे काम केले. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अतिवृष्टीग्रस्त अशा विविध समाजघटकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यातून ऊर्जा मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे, अशी विनंती केली. २०१६ ला मी खासदार झालो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

मी पहिल्यांदा मोदींना भेटलो, तेव्हा मी राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक त्यांना दिले होते. त्यात माझी वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणेच असणार आहे, असे मी लिहिले होते. त्याप्रमाणेच या सहा वर्षात मी समाजहिताच्या दृष्टीने कामे केली. व्यापक स्वरूपात शिवाजी महाराज जयंती दिल्लीत सुरू केली. शाहू जयंती पहिल्यांदा दिल्ली येथे व्यापक स्वरूपात सुरू केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. मराठा आरक्षण रद्द झाले त्यावेळी मी महाविकास आघाडीची बाजू घेतली. मी केवळ समाजहितासाठी भूमिका घेतली. राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याने मी त्या पदाची गरिमा राखली. रायगड किल्ल्याचे जतन केवळ माझ्या पाठपुराव्यामुळे होऊ शकले, असेही ते म्हणाले.

या काळात मी अनेक कामे केली. माझा कार्यकाळ समाजहिताच्या दृष्टीने होता. २००७ पासून २०२२ पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलेय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले ५-६ दिवसच जातो; पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्तादेखील महत्त्वाची आहे हे लकष्ट घेऊन मी आज हे दोन निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Share