मुंबई : राजकीय आकसापोटी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसा पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यात दाखवणार का? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो अशी झाली आहे, अशी टीकाही आ. राणे यांनी केली आहे.
वांद्रे (पश्चिम) मधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तीच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी पत्रातून विचारला आहे.
नितेश राणे यांनी पत्रात काय म्हटले आहे?
गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे (पश्चिम) मधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळले. १७ जण जीवन-मरणाशी लढा देत आहेत. तसेच ४० वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने सबंध मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथे भेट देऊन विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की, त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत, असा आरोप आ. नितेश राणे यांनी केला आहे.
सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरत आहे. मुंबईबाहेरील लोकांच्या मताच्या लोभात अनधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानगी देत आहेत. मुंबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहेरनजर असल्याने ही बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. अनधिकृत बांधकामे वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहोचली आहेत. त्यामुळे जीवाशी खेळ करत तिथे दोन-दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतपणे हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळे निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे, असेही आ. नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.
एकीकडे राजकीय आकसापाीय विरोधकांना अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्पर्ता अनाधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी.
अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठरावीक पक्षांच्या नगरसेवकांसाठी आहेत की काय?असे मत जनमानसात दृढ होईल @CMOMaharashtra @BJP4Maharahtra pic.twitter.com/JGX3CUoOV0— nitesh rane (@NiteshNRane) June 17, 2022
वर्षभरापूर्वी मालाड-मालवणीमध्ये घराचे वाढीव अनधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असेच प्रकरण घडले. या जळत्या चितांचा प्रकाशही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही का? असा प्रश्न नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करू नका, असे आदेश आपण दिलेत. मात्र, आयुक्त कारवाई करत नाहीत. अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरत आहे. राजकीय आकसापोटी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसा पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी, अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठराविक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल, असा टोला नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.