मुंबई : देशात बहुतांश भागात उष्णतेची लाट आली असून, महाराष्ट्र, राजस्थानसह अनेक राज्यांना उन्हाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत चालला आहे. उष्माघातामुळे महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत तब्बल २५ जणांचा बळी गेला असून, राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात उष्णाघातामुळे सर्वाधिक ११ बळी गेले आहेत. उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील ही उच्चांकी नोंद आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा जास्तच कडाक्याचा जाणवत आहे. त्यामुळे यंदा उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. राज्यातील उष्माघाताचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले आहेत. विदर्भात १५, मराठवाड्यात ६ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. विदर्भात नागपूरमध्ये ११ , अकोला जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये एका रुग्णाचा तर, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात २, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उन्हाची तीव्रता वाढली
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ४० ते ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला या शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उष्माघाताने गेल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. मागील दोन महिन्यात नागपुरात उष्णाघातामुळे ११ नागरिकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागात सर्वाधिक २९५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा कडक उन्हामुळे लोकांच्या अंगाची लाहीलाही केली आहे. उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यात पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. एकामागोमाग येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहिले आहे. राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे भूषण यांनी या पत्रात म्हटले आहे.