बीड : ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे मी आजवर आलो नाही याची खंत वाटते. माझ्या खासदारकीच्या काळात मी येथे आलो असतो तर मागेल ते दिले असते. सध्या मी खासदार नसलो तरी नारायणगडाच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन माजी खासदार आणि ‘स्वराज्य’ संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.
संभाजीराजे छत्रपती हे सोमवारी (२७ जून) बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. बीड, श्रीक्षेत्र नारायणगड, गेवराई, तलवाडा, रांजणी, पाडळशिंगी, कुंभारवाडी, मादळमोही, कोळगाव, तांदळा, वडीगोद्री (जि. जालना) येथील ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सोमवारी सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर जाऊन श्री नगद नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी गडाच्या वतीने विश्वस्तांनी संभाजीराजे छत्रपती आणि महंत शिवाजी महाराज यांचा सामूहिक सत्कार केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, श्रीक्षेत्र नगद नारायणगडाच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले जाते. समाजामध्ये एकोपा रहावा, सौहार्द नांदावा यासाठी अध्यात्माच्या माध्यमातून हे क्षेत्र कार्य करते. मराठवाड्यात धाकटी पंढरी म्हणून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडास भेट देऊन समाधान लाभले. महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र नारायणगडावर उत्कृष्ट काम सुरू असल्याचा आनंद आहे. मात्र, एवढे दिवस मी गडावर आलो नाही याची मला खंत वाटते. भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्यानंतर एक विचार तयार होतो. ३५० वर्षांपूर्वी वारीला संरक्षण देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. ती परंपरा आजही पुढे सुरू आहे. मीदेखील आनंदाने वारीमध्ये सहभागी होत असतो.
नारायणगडाच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी मदत करेन. खासदार नसलो तरी वेगवेगळ्या माध्यमातून प्रामाणिकपणे मदत करेन. असे जुने प्राचीन मंदिर पश्चिम महाराष्ट्रात नाही. नारायणगडाच्या वैभवात भर घालण्यासाठी काम करूया, गडावरील पुरातन गोष्टींचे संवर्धन कसे करावे यासाठी माझ्याकडे एक तज्ज्ञ टीम आहे. ती टीम गडावर येऊन पाहणी करेल, असेही संभाजीराजे म्हणाले.
याप्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, गडाचे विश्वस्त अनिल जगताप, बळीराम गवते, बी. बी. जाधव, ॲड. महादेव तुपे, गोवर्धन काशीद, कारागृह अधीक्षक विलास भोईटे, कारागृह निरीक्षक महादेव पवार, धनंजय जाधव आदींची उपस्थिती होती.
संभाजीराजे छत्रपती यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान सोमवारी दुपारी तलवाडा (ता. गेवराई) येथे एका शेतात खरीप पेरणीचे काम सुरू होते. ते पाहून संभाजीराजे छत्रपती चिखल तुडवीत शेतात गेले. चाढ्यावर मूठ धरून पेरणी अनुभवली. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कापडात गुंडाळलेली भाकरी-चटणी काढून शेतकऱ्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या हाती दिली. त्यांनीही प्रेमाचे चार घास खाल्ले. बाजूलाच असलेल्या शेतकऱ्याच्या लहान मुलालाही त्यांनी प्रेमाने घास भरविले. संभाजीराजे छत्रपती यांनी तलवाडा येथे श्री त्वरिता देवी मातेच्या मंदिरात देवीची महाआरती केली व दर्शन घेतले.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार : संभाजीराजे
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकनेते होते. त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न वापरता बंडखोरांनी जगून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर संभाजीराजेंनी हे मत व्यक्त केले. राज्यातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे सरकार कुणीही स्थापन करावे; पण शेतकरी आणि सामान्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत. राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच यंदा अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणी रखडली आहे. राजकीय अस्थिरतेत शेतकऱ्यांची दखल घेतली गेली नाही तर ते आत्महत्या करील. कृषिमंत्री गुवाहाटीमध्ये जाऊन बसले आहेत, असे सांगण्यापेक्षा उपाययोजना करा. राज्यात कुठले सरकार येईल आणि कुठले जाईल, याच्याशी आम्हाला आणि शेतकऱ्यांना काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.