पाझर तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे तुळशीराम तांडा जवळील पाझर तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ऊसतोडीच्या कामासाठी पालम येथील या महिला अहमदपूर तालुक्यात काही दिवसापासून कार्यरत होत्या. आज सकाळी दोन महिला व तीन मुली कपडे धुण्यासाठी पाझर तलावावर गेल्या होत्या. यापैकी एका महिलेचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी एकामागोमाग एक चौघीजणीही पाण्यात उतरल्या. मात्र, दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाचही जणी पाण्यात बुडून मरण पावल्या.

मृत पावलेल्यांमध्ये आई व दोन मुली एकाच घरातील आहेत. राधाबाई धोंडिबा आडे (वय ४५, रा. रामपूर तांडा, ता. पालम, जि. परभणी), दीक्षा धोंडिबा आडे (वय १८) आणि काजल धोंडिबा आडे (वय १८) या मायलेकीसह, सुषमा संजय राठोड (वय २१), अरुणा गंगाधर राठोड (वय १९, दोघीही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम) या पाच जणींचा मृत्यू झाला आहे.

अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर कारखाना सुरू झाल्यापासून पालम तालुक्यातील ऊस तोड कामगार ऊस तोडणीसाठी आले होते. कारखाना बंद होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने त्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले होते. शनिवारी सकाळी वरील ऊसतोड कामगार महिला कारखान्याशेजारीच तुळशीराम तांडा परिसरात असलेल्या तलावावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी गेल्या असता ही दुर्दैवी घटना घडली. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाचही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक राकेश जाधव व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोखले हे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share