कोरोनानंतर आता दहशत ‘टोमॅटो फ्लू’ची! लहान मुलांना वेगाने होतोय संसर्ग

कोईम्बतूर : कोरोनाचा कहर कमी होत असताना आता केरळमध्ये ‘टोमॅटो फ्लू’ या आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांना वेगाने ‘टोमॅटो फ्लू’ चा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत या विषाणूजन्य आजाराने मोठ्या संख्येने लहान मुलांना ग्रासले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘टोमॅटो फ्लू’ या आजाराने बाधित होणाऱ्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश असून, केरळमध्ये शंभराहून अधिक मुले या रोगाने पीडित झाल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये ‘टोमॅटो फ्लू’च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागल्याने तामिळनाडू सरकार सतर्क झाले आहे. तामिळनाडू सरकारने ‘टोमॅटो फ्लू’ चा भलताच धसका घेतला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने राज्याच्या सीमेवर आरोग्यविषयक देखरेख वाढवली आहे. कोईम्बतूरमध्ये ‘टोमॅटो फ्लू’ने प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांचीही चिंता वाढवली आहे. ‘टोमॅटो फ्लू’ चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर आरोग्य अधिकारी तैनात करण्यात आले असून, केरळमधून तामिळनाडूमध्ये येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करूनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जातो आहे.

कोईम्बतूरचे मुख्य आरोग्य निर्देशक डॉक्टर पी. अरुणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टोमॅटो फ्लू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारकडून राज्याच्या सीमेवर तीन तुकड्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये महसूल, आरोग्य आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश असून, शिफ्टनुसार त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीला ताप, पुरळ किंवा फोडांचा त्रास होत असेल तर त्याची नोंद हे अधिकारी घेणार आहेत. यासाठी वलयार चेकपोस्टवर पथके तैनात करण्यात आलि असून, ही चेकपोस्ट तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर आहे. कोईम्बतूर जिल्हा प्रशासनाने २४ तास या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी तैनात केले आहेत.

‘टोमॅटो फ्लू’ म्हणजे काय?
‘टोमॅटो फ्लू’ हा एक अज्ञात ताप आहे, जो मुख्यतः केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. ताप आल्यानंतर अंगावर लाल रंगाचे फोड येत असल्याने या तापाला ‘टोमॅटो फ्लू’ असे नाव देण्यात आले आहे. या फ्लूच्या विळख्यात आल्यानंतर मुलांच्या अंगावर पुरळ आणि फोड येतात. या खुणा सामान्यतः लाल रंगाच्या असतात, त्यामुळे त्याला ‘टोमॅटो फ्लू’ असे संबोधले जात आहे. दरम्यान, हा आजार व्हायरल ताप, चिकुनगुनिया किंवा डेंग्यूचा पोस्ट-इफेक्ट आहे की, नाही यावर सध्या अभ्यास केला जात आहे.

‘टोमॅटो फ्लू’ची लक्षणे काय?
डॉ. पी. अरुणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टोमॅटो फ्लू’चा त्रास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना होतो. या तापाची लक्षणे म्हणजे अंगावर पुरळ येणे, खाज येणे, डायरिया ही आहेत. अनेक अहवालांनुसार ‘टोमॅटो फ्लू’चा त्रास जाणवू लागला की, थकवा, सांधेदुखी, पोटदुखी, उलट्या, खोकला, शिंका येणे, वाहत नाक, ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसू लागतात. काही प्रकरणांमध्ये पायाच्या आणि हाताच्या त्वचेचा रंगही बदलतो. वरील पैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास यासंदर्भात आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच उपचार सुरू करावेत.

काय काळजी घ्यावी?
फ्लू म्हणजेच तापाच्या इतर साथींप्रमाणे ‘टोमॅटो फ्लू’सुद्धा संसर्गजन्य आहे. एखाद्याला याची लागण झाली तर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. कारण या तापाची लागण लगेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही होऊ शकते. या फ्लूमुळे अंगावर आलेले पुरळ आणि फोडांना मुलांनी सतत खाजवू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आराम आणि स्वच्छता या दोन गोष्टींची काळजी घ्यावी. भांडी, कपडे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या इतर गोष्टी सॅनेटाइज करूनच घ्याव्यात. या माध्यमातून संसर्गावर आळा घालता येतो. डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी द्रव्य पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात रुग्णांना द्यावेत.
‘टोमॅटो फ्लू’वर विशिष्ट असे औषध अजून तरी उपलब्ध नाही. योग्य काळजी घेतल्यास त्रास कमी होऊन हा ताप हळूहळू कमी होतो, असे डॉ. अरुणा यांनी सांगितले.

Share