बीड : लग्नाचा मंडप उभारताना विजेच्या तारेचा धक्का बसून वधूच्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथे घडली. हनुमंत अंबादास डोंगरे असे मृत्युमुखी पडलेल्या वधू पित्याचे नाव आहे. डोंगरे यांच्या मुलीला हळद लागल्यानंतर घडलेल्या या दुर्घटनेमुळे डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.
वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथील हनुमंत डोंगरे यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह हिवरापाडी येथील एका मुलाशी ठरला आहे. शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम झाला. रविवारी (२४ एप्रिल) दुपारी हा विवाह समारंभ होणार होता. दोन्ही कुटुंबात जय्यत तयारी सुरू होती. सर्व कुटुंब व नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी मंडप उभारताना मंडपाला वीजवाहक तारेचा करंट लागला. त्यामुळे मंडपात अँगलजवळ बसलेल्या व उभे राहिलेल्या ७ ते ८ जणांना विजेचा धक्का बसला. यात काहीजण या धक्क्याने बाजूला फेकले गेले. वधूपिता हनुमंत डोंगरे यांना विजेचा एवढा जबर धक्का बसला की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. लग्नाऐवजी मुलीच्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.