राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला दिसत आहे. मुंबई, कोकण, मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यात पावसामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत ४ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पहिले २ ते ३ मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. विदर्भातही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पाऊस पडत आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी ५६ फुटांपर्यंत वाढली आहे, तर इतर नद्याही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे याचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात येत्या ८ जुलैपर्यंत अनेक भागात विजांच्या कडकडाटासह १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दररोज घेत आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठका
दरम्यान, पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये आणि झाल्यास तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सर्व परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. ते दररोज आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठका घेत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसामुळे कुठेही जीवितहानी होऊ नये, अशी ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुंबईतही सोमवारपासून (४ जुलै) मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने लोकलच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सध्या मुंबई, ठाणे तसेच उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईमधील तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. लोकल रेल्वे उशिराने धावत आहेत. वसई विरारमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल
कोकणालाही पावसाने झोडपून काढले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह ठाणे, नवी मुंबई, पालघर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही या भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. रायगडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील महाड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे मदत तसेच बचावकार्य सुरू असून एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. कोकणात पुढील चार दिवस धोक्याचे असून येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील काही वर्षापासून पावसाळ्यात कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीणच्या काही भागात ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली होती. मात्र, यंदा पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंदा पावसाच्या पार्शवभूमीवर कल्याणमध्ये एनडीआरएफचे २५ जणांचे पथक दाखल झाले आहे.

Share