गोगलगायीनी पिडीत शेतकऱ्यांना तिप्पट मदत द्या – धनंजय मुंडे

मुंबई : बीड, लातूर व उस्मानाबाद यांसह काही जिल्ह्यांमधील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही. कपाशीवर पडलेल्या बोंडअळीसाठी ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून केली. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर एका लक्ष्यवेधीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली.

या लक्षवेधीवर राज्यसरकारच्यावतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं. सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं. त्यावर धनंजय मुंडे यांनी आपला मुद्दा मांडला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यांवर मीठ टाकून त्यांना नष्ट करत. मात्र, पुन्हा पेरणी केली तरी तीच परिस्थिती उद्भवत आहे. यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायीचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला. याआधीही त्यांनी तीन वेळा राज्य शासनाकडे याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा विषय लक्षवेधी द्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

Share