गृहमंत्र्याच्या आवाहनाला राष्ट्रावादीकडूनचं केराची टोपली

पुणे- कर्नाटकातील अनेक भागांमध्ये हिजाबच्या वादाने पेट घेतल्यानंतर सरकारने उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसऱ्या राज्यातील घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून पुण्यात केंद्र आणि कर्नाटक सरकार विरुद्ध जोरदार आंदोलन सुरु आहे.

राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

तर दुसरीकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटक भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी आहेत. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच कर्नाटक सरकारचा निषेधही नोंदवला गेला .
Share