महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर….

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल कोश्यारी चांगलेच अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहे. आता या प्रकरणी  काॅंग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

”वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे. जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास  पसरवण्याचा उद्योग संघ  परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही.” अशा शब्दात यशोमती ठाकून यांनी कोश्यारी यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं’ असं राज्यपाल म्हणाले. तसंच, ‘शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.

Share