मूठभर मावळे घेऊन जगू, राखेतून पुन्हा उभे राहू : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदार असून, ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी ट्विट करून राज्यातील राजकीय प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे, असे म्हटले आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी, आम्ही स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. मूठभर मावळे घेऊन जगू, राखेतून पुन्हा उभे राहू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोसळणार का याची मला कल्पना नाही. मी सध्या तरी हे सांगू शकणार नाही. आम्ही कधी सत्तेची पर्वा केलेली नाही. स्वाभिमानाने जगू. आम्ही कधी शरणार्थी म्हणून जगलो नाही. आम्ही स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. मूठभर मावळे घेऊन जगू. पुन्हा राखेतून उभे राहू. जनता दलापासून हे होत आले आहे. राज ठाकरे, नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हादेखील ‘राजकीय भूकंप’ असे शब्द वापरले गेले. मात्र, शिवसेना पुन्हा उभा राहिली, असे खा. अरविंद सावंत म्हणाले.

आज संध्याकाळी उद्धव ठाकरे एक बैठक घेणार आहेत. सध्याच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, हा या बैठकीचा अजेंडा आहे. मुळात शिवसेना ही आमदारांमुळे नाही. शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे. विधानसभा बरखास्तीबाबत निर्णय होणार का यावरही आजच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती खा. सावंत यांनी दिली.

आमच्या नितीन देशमुख नावाच्या आमदाराला मारून घेऊन गेले. मला येऊ देत नाहीत, असे ते म्हणत होते. जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत तिकडे गेले, त्यांनी शिवसैनिक तसेच जनतेशी प्रतारणा केली आहे. आज आनंद दिघे असते तर त्यांना हे मान्य असते का? पक्षात मतभेत असावेत, मनभेद नसावेत. पक्षात राहून, पदाचा वापर करून एका दिवसात प्लॅन केला गेला. विमानाचे पैसे कोण देत आहे? हॉटेलचे पैसे कोण देत आहे? ईडी झोपली आहे का? आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सरकार आणि राजकीय चित्र स्पष्ट होईल, असेही खा. अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले.

Share