आम्ही बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तुम्ही भोंगे काढायलाही घाबरता!

मुंबई : बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र, हा ढाचा आम्ही पाडला असून, त्याचा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत रविवारी झालेल्या ‘बूस्टर’ सभेत शिवसेनेला लक्ष्य केले. ज्यांना मशिदीवरील भोंगे उतरविणे जमत नाहीत, ते काय बाबरी मशीद पाडणार? मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर यांची हातभर फाटली. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात, बाबरी मशीद आम्ही पाडली, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांना लगावला.

मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपने काढलेल्या पोलखोल यात्रेचा समारोप या ‘बूस्टर’ सभेत करण्यात आला. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी फडणवीस यांनी हनुमान चालिसा आणि बाबरी मशीद प्रकरणावर भाष्य केले. बाबरी मशीद पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आदींचा समावेश होता. मात्र, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. बाबरीचा ढाचा पाडला जात होता, तेव्हा तुम्ही गोळीबार करण्यास परवानगी दिली नाही, असे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना विचारण्यात आले होते. तेव्हा तिथे साडेतीन लाख कारसेवक होते आणि त्यांच्यावर मी गोळी चालवू देणार नाही, असे ते म्हणाले होते. कल्याणसिंह यांनी सरकार पणाला लावले आणि महाराष्ट्रात मात्र राम अस्तित्वात होते का, असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या व ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले आहेत,’ असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

राम मंदिरासाठी मी बदायूच्या तुरुंगात १८ दिवस घालवले

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात होता, असे हे आम्हाला विचारत आहेत. त्यांना मशिदीवरील भोंगे काढायला लावले तर ते घाबरले. हे बाबरी मशीद काय पाडणार? वास्तविक ती बाबरी मशीद नव्हती, तर परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, असे सांगून फडणवीस याप्रसंगी म्हणाले, आमचे नेते ३० वर्षे खटले लढत होते. आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि शिस्तही मोडता येत नाही. मात्र, माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी अभिमानाने सांगतो, तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिरासाठी बदायूच्या तुरुंगात मी १८ दिवस घालवले. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे उदाहरण देताना, मुख्यमंत्र्यांचे आतापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ आम्हाला माहीत होते. मात्र, आता ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरू झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राणा दाम्पत्यावर हनुमान चालिसा म्हटल्यामुळे राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हणण्यामागे या दाम्पत्याचा राज्य सरकार उलटवण्याचा डाव होता, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवले जाणार आहे की रावणाचे? त्यामुळे तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या हे एकदाच स्पष्ट करा, असे फडणवीस ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
काश्मीरमध्ये आम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत गेल्याचे म्हटले जाते. हो आम्ही गेलो. कारण त्यावेळी आवश्यकता होती. पाकिस्तानने निवडणुका घेऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर आमच्या सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या. ६० टक्के मतदान झाले. त्यावेळी आम्ही मुफ्तींसोबत काश्मिरमध्ये सरकार तयार केले आणि पाकिस्तानला इशारा दिला. ज्या क्षणी हे काम झाले त्यावेळी सत्तेला लाथ मारून मेहबुबा मुफ्तींना खाली खेचण्याचे काम भाजपने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितले की, कलम ३७० काढण्यात येईल. काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा वाघ तयार झाला, असेही फडणवीस म्हणाले. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदू नाही… पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. हनुमान चालिसा म्हणून बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असे शरद पवार सांगतात. मग इफ्तार पार्ट्या करूनही प्रश्न सुटणार नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

मुंबई माफियांच्या व लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करायची आहे
बाळासाहेबांवर विश्वास ठेवून आम्ही मुंबई शिवसेनेच्या हाती दिली होती. आम्हाला वाटायचे, राज्यात भगवी सत्ता आहे. मात्र, आता तसे राहिलेले नाही. त्यांनी मुंबईला लुटण्याचे काम केले आहे. कोविड काळात तर सर्वसामान्यांपेक्षा विकासकांचे, बार चालकांचे आणि मद्यपान करणाऱ्यांचे भले झाले. त्यामुळेच आता मुंबईच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे आहे. मी असे म्हटल्यावर लगेचच यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असे म्हटले जाईल. मात्र, तसे नसून मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार आहे. मात्र, हे भावनिक गोष्टीतून मराठी माणाला लुबाडत असून ते आता आम्ही पुढे चालू देणार नाही. मुंबईला माफिया तसेच लूटमारांच्या हातून सोडवायचे असून, आम्हाला पुन्हा मुंबईकरांच्या हातात मुंबई सोपवायची आहे. त्यासाठीच महाराष्ट्र दिनी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

१४ मेनंतर पोलखोल सभा
आजची सभा ही पोलखोल सभा नाही. १४ मेनंतर मी तशी सभा घेणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यानंतर सभा घेण्याची घोषणा यावेळी केली.

Share