गोदावरी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

बीड : गावातील यात्रेसाठी कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील राजापूर येथे आज शनिवारी सकाळी घडली. मोहन नाना अतकरे (वय १८ वर्षे) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले (वय १८ वर्षे) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघेही निपाणी जवळका (ता.गेवराई, जि.बीड) येथील रहिवासी होते.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका याठिकाणी श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे. शनिवारी (१६ एप्रिल) सकाळी या गावातील तरुण गोदावरी नदीकाठी असलेल्या राजापूर या ठिकाणी कावडीने पाणी आणण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करत असताना मोहन अतकरे व शिवाजी इंगोले या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नदीत बुडालेल्‍या दोन्ही युवकांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share