हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटदाराचा सहकुटुंब मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील एका कंत्राटदारासह त्याच्या कुटुंबातील दोन महिलांनी आज मुंबई येथे मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. राजू चन्नापा हुनगुंडे असे आत्मदहन करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत.

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या राजू चन्नापा हनगुंडे यांनी यावेळी हंबरडा फोडत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले की, आपण नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले. ज्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यापैकी आपल्याला केवळ १४ लाख रुपये देण्यात आले असून, कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मी कर्ज घेऊन या रस्त्याचे काम पूर्ण केले. याबाबत आपण काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेतली होती; परंतु तरीदेखील आपल्याला कामाचे उर्वरित पैसे मिळाले नाहीत. बांधकाम विभागातील कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल उचलल्याचे राजू हनगुंडे यांनी सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण?
राजू चन्नापा हुनगुंडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील रहिवासी असून ते रस्त्यांची कामे करण्याची कामे करतात. हुनगुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले आहे. ज्यासाठी त्यांना १ कोटी ७० लाख रुपयांचे बिल येणे होते. मात्र, त्यातील केवळ १४ लाख रुपयेच त्यांना देण्यात आले आहेत. उर्वरित पैशांची मागणी केल्यानंतर ते देण्याऐवजी आपल्याला व कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली, असा आरोप हुनगुंडे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाबाबत आणि उर्वरित पैसे मिळण्यासाठी आपण बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली; परंतु याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे अखेर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे राजू हुनगुंडे यांनी सांगितले. मी भटक्या समाजातील असल्यानेच माझ्यावर अन्याय होत असल्याचा दावाही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या हुनगुंडे यांनी केला. दरम्यान, राजधानी मुंबईत मंत्रालयाजवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.

Share