जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार!

मुंबई : जोपर्यंत मशिदींवरील भोंग्यातून अजान दिली जाईल, तोपर्यंत मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणार. दिवसभरात ज्या-ज्यावेळी अजान लागेल त्या-त्यावेळी हनुमान चालिसा लागेल. भोंग्याचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, तर जोपर्यंत यावर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार, जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात त्यांची भूमिका अशीच आक्रमक राहणार असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, जवळपास ९०-९२ टक्के महाराष्ट्रात आज सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. मशिदीमधील मौलवींचं मी आभार मानेन, आमचा विषय त्यांना समजला. मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये आज सकाळची अजान ५ च्या आत झाली. मुंबईतील १००५ मशिदीवर भोंगे लागले नाहीत. त्या मशिदींतील मौलवींचे आभार मानतो. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलवींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आता ज्या १३५ मशिदींमधून अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता? पोलिस मनसैनिकांना नोटीस पाठवत आहेत, पकडत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबतच का होते हा आमचा प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना का पकडता?

आधी भोंगे खाली उतरवा
‘मी सांगितलं होतं की, भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच काम आहे का, रोज डेसिबल मोजायचं? लोकांनी हेच करायचं का? तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती मशिदीत करा, मात्र माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? त्यामुळे हे भोंगे खाली उतरवले पाहिजेत, ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही, यावर निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय
‘सरकार सांगतंय आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतोय, मग करायचं असेल तर पूर्ण करा. आज ९२ टक्के मशिदींवर भोंगे लागले नाही, यावरून आम्ही खूश होणार नाही. दिवसभरातील बांगदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच डेसिबलमध्ये लागल्या गेल्या पाहिजे, अन्यथा हनुमान चालिसा लागणार. हा धार्मिक विषय नाही, तर सामाजिक विषय आहे. त्याला धार्मिक वळण दिलं तर आम्हीदेखील देऊ, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. कुठेही शांतता बिघडावी, दंगली व्हाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही, गरज नाही, असेही ते म्हणाले.

धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का?
“महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय की, हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलिस आयुक्त, पोलिस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. ३६५ दिवस दिवसभरात चार, पाच वेळा अजान लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचं. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी विचारला.

हे कोणत्या काळात जगताहेत माहिती नाही
“आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? मोबाईलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार? हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताहेत का? एवढा मूर्खपणा… हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी राज्य सरकार व पोलिसांवर केली.

Share