शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई; जालना साखर कारखान्याची मालमत्ता जप्त

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे संचालक असलेल्या जालना सहकारी साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आज मोठी कारवाई केली. जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ‘पीएमएलए’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथे जालना सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९८४-८५ मध्ये सुमारे २३५ एकर जमिनीवर करण्यात आली होती. ज्यात १०० एकर जमीन महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय प्राप्त झाली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अयशस्वी ठरला होता, असे ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत केलेल्या तपासणीत दिसून आले होते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत तपास सुरू केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या २२ ऑगस्ट २०१९ च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता.

दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जालना सहकारी साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे या साखर कारखान्याचे संचालक आहेत.

गतवर्षी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात अर्जुन खोतकर यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर अर्जुन खोतकर यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर काही दिवसांतच ईडीने अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. जालना साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित औरंगाबाद येथील दोन उद्योजकांवरही ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री संलग्नित करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी जालना साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत, कारखान्याची यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना हादरली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक सेना नेते ईडीच्या रडारवर आहेत. दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी अनिल परब यांची चौकशी ईडी करत आहे यादरम्यान आता अर्जुन खोतकर यांच्यावरदेखील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने नेमकी कारवाई काय केली ते मला माहिती नाही. सध्या मी बाहेरगावी आहे. ईडीला कारवाई करण्याचा अधिकार आहे. या कारवाईच्या विरोधात कोर्टात लढू, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Share